नवी दिल्ली - दिल्लीहून मुंबईकडे जाणार्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी टेकऑफनंतर तातडीने आपत्कालीन स्थितीत दिल्लीला परतावे लागले. उड्डाणानंतर या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड समोर आला. त्यानंतर विमान पायलटने सुरक्षेला प्राधान्य देत एअर टर्नबॅक घेण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर सर्व प्रवासी आणि क्र मेंबरला सुरक्षित विमानतळावर उतरवण्यात आले. ही घटना एअर इंडियाच्या ८८७ विमानात घडली. हे विमान दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले होते. हे उड्डाण बोईंग ७७७-३००ईआर (-) विमानाने केले जात होते.
सूत्रांनुसार, टेकऑफनंतर काही मिनिटांनी या विमानाचे फ्लॅप मागे घेतले जात होते त्याचवेळी विमानातील क्रू मेंबर्सला उजव्या इंजिनमध्ये तेलाचा दाब कमी असल्याची सूचना मिळाली. काही क्षणांनी इंजिनचे ऑयल प्रेशर पूर्णपणे शून्य झाले होते. ज्यातून तांत्रिक बिघाड निर्माण झाला. सुरक्षेच्या दृष्टीने पायलटने तातडीने एअर टर्नबॅक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान सावधानीपूर्वक दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळले आणि मानक प्रक्रियेचे पालन करत सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
एअर इंडियाचं अधिकृत निवेदन केले जारी
मानक कार्यप्रणालीनुसार विमान परत दिल्ली विमानतळावर आणण्यात आले असं एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले. ही लँडिंग पूर्णपणे सुरक्षित होती आणि कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही असं विमान कंपनीने स्पष्ट केले.
तांत्रिक तपासणी सुरू, विमान सध्या ग्राउंड केले
दरम्यान, या विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे असं एअर इंडियाने सांगितले. इंजिन ऑइलच्या वापराबद्दल कोणत्याही असामान्यतेची नोंद मागील रेकॉर्डमध्ये नव्हती असं सुरुवातीच्या तपासात दिसून आले. विमान सध्या ग्राउंड केलेले आहे आणि सर्व आवश्यक तपास पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा सेवा सुरू करेल असं कंपनीने सांगितले.